* सुस्वागतम * 'साहित्य दरबारात' आपले स्वागत आहे

-----------------------------------------------------

गाणी ऐका

Powered by eSnips.com

Wednesday, June 17, 2009

आपले लक्ष्य


अरे.....माझ्या हाताला इतक्या वेदना का होताहेत ? आणि इतकं रक्तं.... अरे...अरे...मिस्टर द्रोणनाथन, आपण इतके
निर्दयी कसे होऊ शकता ? आपण माझा अंगठा का कापलात ?
वेदनेने कळवळत एकलव्य जागा झाला. त्याने आपला उजवा हात चाचपडला. आपला अंगठा सुरक्षित पाहून त्याने
सुटकेचा निश्वास सोडला. त्याला वाटलं, आपल्याला पडलेलं हे भीतीदायक स्वप्नं आपल्याला जीवनात होणा-या दुःख
वेदनेचा आरसा तर नसेल ? तो मनातल्या मनात म्हणाला, " हे दुःख या वेदना किती काळ माझ्याजवळ रहाणार,
कुणास ठाऊक ? " तो उठून आपल्या खोलीला लागून असलेल्या बाल्कनीत गेला. बाहेरचं मोकळं आकाश पाहून त्याने
आपले दोन्ही हात पसरले आणि करुणा भाकली. " परमेश्वरा, तू माझी असहाय्यता किती काळपर्यंत अशी नुसतीच बघत
बसणार ? नुसताच बघत रहाशील, की कधी खालीही येशील ?...."
एवढ्यात त्याने खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं, सोसायटीच्या पार्किंगमध्ये सामानाने भरलेला
एक टेम्पो येऊन उभा रहिलाय. तो उत्सुकतेने खाली गेला. खाली येताच त्याला दिसलं, की टेम्पोच्या मागे एक रिक्षा
उभी आहे. रिक्षातून जवळ जवळ सहा फूट उंचीचा, आकर्षक व्यक्तिमत्वाचा एक माणूस खाली उतरला. त्याने जीन्स आणि
पांढ-या रंगाचा कुडता घातला होता. या साध्या वेशातही त्याचं व्यक्तिमत्व तेजस्वी आणि असामान्य असं प्रतीत होत
होतं. एकलव्याला वाटलं, टी. व्ही.वरील महाभारताच्या सिरियलमधून कुणा दिव्य पुरुषाचं आगमन झालय, कारण
त्याच्या प्रसन्न मुखमुद्रेवर दिव्यत्वाची आभा झळकत होती. त्या अपरिचित माणसाचं दिव्य रूप पहून एकलव्याच्या
मनात खुशीची लहर निर्माण झाली. एकलव्याला त्यावेळी माहीत नव्हतं, की ईश्वराने त्याची प्रार्थना किती लवकर
ऐकली. एकलव्याच्या मनात त्या नव्या माणसाची ऒळख करून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्या माणसाच्या
जवळ जाऊन एकलव्याने विचारले, " आपल्याला या पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. आपण नव्याने या बिल्डिंगमध्ये
रहाण्यासाठी आला आहात का ? "
आपल्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरचा एक फ्लॅट रिकामा आहे, हे एकलव्याला माहीत होते.
" होय आणि नाहीही ! " तो अपरिचित माणूस गंभीरपणे म्हणाला.
त्या माणसाचं असं गोंधळात टाकणारं उत्तर ऐकून एकलव्य विचारात पडला. त्याला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती.
होय पण... आणि नाही पण.... याचा अर्थ काय ? काही वेळ गप्प बसून, काहीशा साशंकतेने तो त्या नव्या व्यक्तिला
न्याहाळू लागला. आपल्या प्रश्नाचं खरं खुरं उत्तर मिळवण्याच्या प्रयत्नात पुढे म्हणाला, " ते कसं काय ? "
" हा फ्लॅट माझ्या मित्राचा आहे. फ्लॅटबाबत कोर्टात केस चालू आहे. कोर्टाचा निर्णय माझ्या मित्राच्या बाजूने लागला,
तर मी इथे राहीन.... नाही तर मी इथून दुसरीकडे कुठे तरी निघून जाईन ! " त्या माणसाने आपल्या पहिल्या उत्तराचं
रहस्य उलगडलं.
एकलव्याने सगळं नीट समजल्यासारखी होकारार्थी मान हलवली. " अच्छा.... असं आहे तर... आपल्याकडे पुष्कळ
सामान दिसतय. आपलं सामान वर नेण्यासाठी मी आपल्याला मदत करू का ? "
एकलव्याला माहीत नव्हतं, की त्याचं आणखी एक उत्तर त्याला पुन्हा कोड्यात टकणार आहे.
" जरूर ! " त्या माणसाचं हे दुसरं उत्तर. पण तो एवढच बोलून थांबला नाही. तो पुढे म्हणाला, " तुम्ही माझी मदत
करू शकता पण.... "
" पण काय ? "
" जर तुम्ही स्वतःची मदत करू शकत असाल तर....."
" म्हणजे याचा अर्थ काय ? " एकलव्याने चमकून विचारले.
" स्वतःची मदत करणाराच माणूस खूश, आनंदी राहू शकतो आणि आनंदी, खूश असलेल्या लोकांनीच केलेली
मदत मी स्वीकारतो...."
त्या अपरिचित माणसाची अट ऐकून एकलव्याला थोडी लाज वटली. मिस्टर द्रोणनाथनचा चेहरा त्याच्यासमोर
साकार झाला. द्रोणनाथन त्याच्या बॉसचं नाव. त्यांचे शब्द एकलव्याला आत्ताही ऐकू येत होते....." आपलं ड्रॉईंग मला
पसंत पडलय. आपण कुशल आहात, पण आपल्या कौशल्याचा उपयोग आम्ही पुढ्च्या प्रोजेक्टमध्ये करून घेऊ.
नाराज होण्याचं कारण नाही. "
ऑफीसमधील ही घटना आठवून एकलव्य काही काळगप्प झाला. मग काहीशा खजील स्वरात म्हणाला, " मी
यावेळी दुःखी आहे, पण अपल्याला मदत करण्यात मला आनंदच वाटेल. "
" मग तर तू माझी मदत करच ! पण त्यापूर्वी माझा एक छोटा विनोद ऐक. " त्या नव्या माणसाने पहिल्या
सारख्याच गंभीरपणे म्हंटलं. आता एकलव्याला धीर आला. एकलव्याला त्याच्या बोलण्यातून असं मुळीच जाणवलं
नाही, की तो थट्टा करतोय. तो विचार करू लागला, याचा चेहरा- मोहरा तेजस्वी आणि आनंदी दिसतोय, पण काही
विचारलं तर विलक्षणच उत्तर देतोय. मग त्याला वाटलं, जिथं इतका वेळपर्यंत त्याला सहन केलं, तिथं आणखी थोडा
वेळ....असा विचार करून त्याने त्याचा विनोद ऐकण्यासाठी होकार भरला.
" काय ऐकतोयस ना ? " त्या माणसाने आपलं हसू लपवत विचारलं.
" अं.....हो ! "
" दोघे मित्र आपापसात गप्पा मारत आपल्याच नादात रस्त्यातून चालले होते. पहिल्या मित्राने तक्रार करत
दुस-या मित्राला म्हंटलं, " तू हा चष्मा का वापरतोस ? तू हा चष्मा लावतोस, तेव्हा तू मला अगदी घुबडासारखा दिसतोस."
पहिल्या मित्राच्या प्रश्नाचं शांतपणे उत्तर देत दुसरा मित्र म्हणाला," जेव्हा मी चष्मा वापरत नाही, तेव्हा तू मला
घुबडासारखा दिसतोस. "
विनोद ऐकून आणि त्याच्या, तो सांगण्याच्या शैलीने, एकलव्य खो खो हसू लागला. एकलव्याला मनमोकळं
हसताना बघून त्या नव्या माणसाने खोडकरपणे म्हंटलं, " आता तू काहीसा माझी मदत करण्याच्या लायकीचा झाला
आहेस. "
" याचा अर्थ काय ? "
नव्या माणसाने एकलव्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता दुसरा विनोद सांगायला सुरुवात केली. " एका मित्राने आपल्या
दुस-या खेडवळ मित्राला विचारलं, " गांधीजयंतीबद्दल तुला काय माहिती आहे ? " तेव्हा तो खेडवळ मित्र म्हणाला,
गांधीजी एक महान पुरुष होते, पण जयंती कोण होती, हे नाही माहीत मला !
एकलव्य कोड्यात पडल्यासारखा हसू लागला. त्याला कळेना, की त्याने हसतच रहावं, की तिथून निघून जावं ?
तेवढ्यात त्याला त्या माणसाचे शब्द ऐकू आले, " उभा का राहिलाहेस ? चल माझी मदत कर ! "
एकलव्याने त्या माणसाचं सामान उचललं आणि बिल्डिंगकडे निघाला.
" आता तू माझी मदत करू शकतोस, कारण आता तू खूश आहेस. "
" आपण नेहमी असंच करता ? " एकलव्याने सामान्य स्थितीत येत विचारले.
" हो ! मी नेहमी खूश असणा-या लोकांकडूनच मदत घेतो. जर ते खूश नसतील, तर प्रथम त्यांना खूश करतो,
कारण खूश, आनंदी असणारा माणूसच कुणाचीही योग्य त-हेने मदत करू शकतो. आपल्या दुःखात चूर असणार्‍या
माणसाची योग्य त-हेने मदत करण्याची कुवत नसते. "
नव्या माणसाचं हे बोलणं एकलव्याच्या बुद्धीपेक्षा ह्रुदयाला स्पर्श करून गेलं. त्याने त्या अपरिचिताला लिफ्ट्द्वारे
वरच्या फ्लॅटपर्यंत पोचवले.
सामान घेऊन जाताना लिफ्टमध्येही दोघांचं बोलणं सुरूच होतं.
" माझं नाव एकलव्य. आपलं ? "
" माफ करा ! मी माझं नाव आणि काम दुस-याला सांगायला थोडा वेळ घेतो. "
" काही हरकत नाही. मी आपलं आपल्याला समजून घेण्यासाठी विचारलं. "
" एकलव्याला जाणून घेण्याचा तरी कधी प्रयत्न करतोस ? "
" अं... मला कळलं नाही." एकलव्य गडबडला. असा विलक्षण प्रश्न त्याला अगदी अनपेक्षित होता.
" काही नाही... मी अशीच गंमत केली.... चल माझ्या मित्राचा फ्लॅट आला. " लिफ्ट्मधून बाहेर पडत तो म्हणाला.
त्याने एकलव्याच्या मदतीने आपलं सामान फ्लॅटच्या दरवाजाशी ठेवलं आणि कुलूप काढलं. एकलव्याला वाटलं, तो
माणूस त्याला आत येण्याचं निमंत्रण देईल. पण तो अनोळखी माणूस अनोळखीच राहिला.
" एकलव्य, तुला भेटून आनंद झाला ! " एकलव्याला आत न बोलावताच त्याच्याशी हस्तांदोलन करून तो
अनोळखी माणूस म्हणाला आणि त्याला जाण्याचा हलकासा इशारा केला.
" मलाही आपल्याला भेटून अतिशय आनंद झाला. " एकलव्यानेही हात उंचावून त्याचा निरोप घेतला. या अनोळखी
माणसाच्या अनपेक्षित व्यवहाराने एकलव्य आचंबित झाला होता. " याने तर मला बाहेरूनच घालवून दिलं." एकलव्य
मनातल्या मनात बडबडला.
एकलव्याचा फ्लॅट या अनोळखी माणसाच्या फ्लॅटच्या बरोबर खाली होता. आपल्या फ्लॅटकडे परतताना
एकलव्याच्या मनात विचार आला, की या माणसाला अशा कही गोष्टी माहीत आहेत, की ज्यामुळे तो इतका आनंदी
आणि तेजस्वी दिसतोय, पण त्याने आपलं नाव का नाही सांगितलं ?
दुस-याला मदत करणं, एकलव्याच्या स्वभावातच होतं. त्या अपरिचित माणसाला मदत करून त्याला जो आनंद
होत होता, असा आनंद या पूर्वी त्याला कधीच झाला नव्हता. आनंद आणि आश्चर्य यांच्या संमिश्र भावनेने भारावून तो घरी परतला।

--------------------------------------------
उज्ज्वला केळ्कर यांच्या अगामी अनुवादित पुस्तक ' आपले लक्ष्य ' यातून साभार

Friday, June 12, 2009

दुहेरी फायदा

राष्ट्रपतीभवनातून एक वटहुकूम जारी करण्यात आला. या वटहुकूमाद्वारे सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक लस टोचून घेणे, अनिवार्य करण्यात आले. वर्तमानपत्रातून आवेदन दिलं गेलं. निविदा मागवण्यात आल्या. कमी किमतीच्या निविदेवर शिक्का मोर्तब करण्यात आलं. त्यांना ऑर्डर देण्यात आली.लसीचे शिशे आले. डॉक्टर आले.
या सगळ्या गोष्टी इतक्या झटपट घडल्या , की प्रथम कुणाला काही कळंलच नाही. शासकीय अखत्यारीतील कदाचित ही पहिलीच गोष्ट असेल, इतकी झटपट घडलेली ! पण हे जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा, मंत्री-संत्री , सचीव -अधिकारी , चपरासी- कार्यकर्ते -अनुयायी, पैसे खाणारे -पैसे देणारे स्सरेच हादरुन गेले. सुन्न झाले.
' हं ! आता मंत्री होण्यात काय फायदा ? ' मंत्री फुसफुसले.
' आता काय फायदा सचिव होण्याचा ? ' सचिव म्हणाले.
' आता काय फायदा लाळ घोटण्याचा? ' कार्यकर्ते उद्गारले.
' आता काय फायदा शिपाई होण्यात ? ' शिपाई पुटपुटले.
इतक्यात डॉक्टर नॅपकिनने हात पुसत बाहेर आले.
' असे चेहरे पाडून का बसला आहात मंडळी ? ' त्यांनी विचारले.
' आपली करणी ...'
माझी करणी ? कसली ?
' असं वेड पांघरुन पेडगावला जाऊ नका डॉक्टर.... ही ही भ्रष्टाचारविरोधी लस ... आत्ता टोचली ती..'
' ओह ... तिचं टेन्शन घेऊ नका तुम्ही ... त्या लसीचा फारसा परिणाम होणार नाही !'
' ते कसं ? '
' त्या लसीत भेसळ केलेली आहे. कमी कोटेशन देऊन निविदा भरली होती ना ! '
'असं पण का? '
' दुहेरी फायदा ... कमी कोटेशनमुळे निविदा मंजूर झाली आणि आता आपण मंडळी माझ्या इमानदारीचा काही विचार करालच ना ? '

---------------------------------------------------------------------------------------------
लेखिका - सौ उज्ज्वला केळकर, सांगली

Friday, June 5, 2009

पुरस्कार

-----------------------------------------------------------------------------

पुलावरुन धडधड करत राजधानी एक्सप्रेस निघून गेली. रोजच्या प्रमाणेच आजही भिकू जागा झाला. तो पळत पळत गल्लीत असलेल्या सार्वजनिक नळावर गेला. हात, पाय, तोंड धुतलं. बायको मुलं अजून झोपलेली होती. त्याने समोरच्या हॉटेलातून चहा आणि गरमागरम भजी आणली आणि चहा बरोबर तो भजी खाऊ लागला. भज्यांचा खमंग वास बायको मुलांच्या नाकात शिरला, तशी ती उठली.
बायको बघत राहिली. मुलांनी हात, तोंड न धुताच कागदातून भजी ओढून खायला सुरवात केली होती.
भजी संपली अन भिकूचं लक्ष कागदाच्या तुकड्याकडे गेलं. 'अरे हा तर आपलाच फोटो..' भिकूच्या तोंडून अभावितपणे बाहेर पडलं. फोटोत तो आपल्या बायको- मुलांबरोबर बसला होता. शेजारी फाटक्या गोधडया, चिंध्यांची गाठोडी ठेवलेली होती. साडीच्या चिंध्या पांघरलेल्या बायकोचा फाटका पदर डोक्यावर होता. मुलं माकडाप्रमाणे दात विचकत होती. भटक्या जिवनाचा तो वास्तव फोटो होता.
भिकूने तो फोटो सगळ्यांना दाखवला. फोटोखाली लिहिलं होतं, 'पुलाखालचं घर' . प्रथम पुरस्कार ५००० रु. अजय शर्मा- मुंबई.
आता त्याला आठवलं. काही दिवसापूर्वी एक फोटोग्राफर तिथे आला होता. त्या सगळ्यांना निट न्याहळून बघितल्यावर , त्यांचा फोटो काढण्याची ईच्छा त्याने प्रदर्शीत केली. मुलं तर एकदम खुश झाली. त्याने सांगितल्या तशा पोझेस त्यांनी दिल्या. जाण्यापूर्वी फोटोग्राफरने भिकूच्या हातावर ५० रु. ठेवले. त्या दिवशी सगले आनंदात होते. त्या दिवशी सगळ्यांनी भज्यांबरोबर जिलबीही खाल्ली.
भिकू आता विचार करु लागला, ५००० रु। म्हणजे किती वेळा ५० रु?

----------------------------------------------------------------
लेखिका - सौ उज्ज्वला केळकर, सांगली

Sunday, May 31, 2009

पुतळा

------------------------------------------------------
' साहेब ...'
' बोल ...'
' शासनाच्या प्रत्तेक निर्णयाला विरोध करायचा हीच आपली पक्षीय नीती आहे ना ? '
' बरं ? मगं ? '
' मग मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेचं आपण स्वागत आणि समर्थन कसं केलत ? '
' कोणती घोषणा ? '
' तीच ... शहरातल्या मध्यवर्ती भागात त्या राजनेत्याचा पुतळा उभा करण्याची ?
आपण म्हणालात, की कुठल्या ही विधायक कार्यात आम्ही सत्याधार्‍यांच्या बाजूने राहू ! सत्ताधारी पक्षाला साथ देऊ ! '
' अरे मूर्खा , पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागेल .'
' बरोबर ! '
' या कामात आपण त्यांना मदत करु ! '
' का ? '
' म्हणजे वर्गणीचा काही भाग आपल्या खजिन्यात जाऊ शकेल !'
' हं ! हे ही बरोबर ! '
' पुतळा उभा केल्यानंतर कुणी ना कुणी, कधी ना कधी , पुतळयाची विटंबना करणारच ! '
' अं ...'
'...... आणि तसं नाही झालंच, तर आपण ती व्यवस्था करु ... काय?
' पण का ? '
' त्या निमित्याने शहरात दंगा होईल. जाळपोळ, लुटालुट होईल. मग काय, आपली चांदीच चांदी ... काय ?'
' खरंय साहेब ...'

----------------------------------------------------------------------------------
लेखिका - सौ उज्ज्वला केळकर, सांगली

Wednesday, May 27, 2009

प्रवाह


एका अनावर ओढीने
ऐल पैल ओलांडत
सुसाटत, फुफाटत निघालेला
तुझा वेगवान प्रवाह
पालाण घालत
बेगुमान धडका देतोय
झाडाला
पण , त्याची मुळं आता
खुप खोलवर रुजलीयत.
विस्तारलीतसुध्दा...
तुझ्या आवेगाने
मुळातळीची माती सैलावेल
एखादी क्म्च हिरवी फांदीकी येईल
गळामिठी घालत
तुझ्यासोबत.
पण आता सारंच उन्मळून
तुझ्या प्रवाहावर झोकून देणं
कसं घडेल?
त्यापेक्षा तूच आवर ना तुझा आवेग
आणि
शांत समंजस होऊन वहात रहा
ऐल पैलाच्या मर्यादेत
काठांवरुन पानांचे हे स्नेहल डोळे
स्निग्धछाया धरतील तुझ्यावर
सदाचीच......
------------------------------------------
कवयित्री - सौ. उज्वला केळकर. - सांगली

त्यावेळी

त्यावेळी
वाटलं होतं
आपण
एकमेकांना
अगदी अनुरुप
जसं
दोन देह
एक मन
दोन श्वास
एक जीवन.
पण
पुलाखालून
थोडं पाणी
वाहून गेलं
आणि लक्षात आलं
आपले फुलण्याचे रुतू वेगळे
तसेच , पानग्ळीचेही.
आता आपण कुरवाळतो.
स्वतंत्रपणे
पाखरांच्या स्मृती
आपल्या बहरानंतरच्या
आणि वाट पहातो
नव्या बहराची
आपल्या पानगळीनंतरच्या

----------------------------------------
कवयित्री - सौ. उज्वला केळकर. - सांगली

Friday, May 22, 2009

तू अशी स्वप्नात माझ्या येऊ नको ग साजणी

तू अशी स्वप्नात माझ्या येऊ नको ग साजणी
कस्तुरीचा गंध उधळित नकोस जाऊ कामिनी !!धृ !!
तव तेजाच्या प्रकाश किरणी फूल मनाचे उमलून आले
मावळतीला मिटू नको ग सूर्यफूलांचा बहर घेऊनी !!
तुझ्या स्वराच्या हिंदोळ्यावर शब्द माझे बांधले मी
गीत ते आकाशवेडे गाऊ आपण दोघे मिळोनी !!
नेंणीवेच्या काठावरुनी बोलाविशी तू चंचले
बोलाविले गे मी तुला सत्यात अन् जागेपणी !!

कवयित्री - सौ। उज्वला केळकर। - सांगली

Tuesday, April 28, 2009

अरे याला कुणी मत देणार का मत ?

अरे याला कुणी मत देणार का मत ?

ह्या तुमच्या लोकानायाकाला
दिल्लीत राहून सेवा करणार्‍या
गरिबांच्या कैवार्‍याला
कुणी मत देणार का मत ?

खूप पक्ष सोडले
खूप पैसे लाटले
खूप काहीच्या काही केलं
आणि सत्तेतल्या राक्षसाला
सारखं भ्रष्टाचाराच व्यसन लागलं.
बिच्चार्‍या ह्या राक्षसाला
कुणी मत देणार का मत ?
खातं गेलं, घर गेलं,
रुबाब गेला,गाडी गेलीआता
मतदारसंघही बदलतोय
पाच वर्षात न दिसलेल्या
या भिकार्‍याला
कुणी मत देणार का मत ?

निष्ठेला टोपी घातली
सुखी माणसाची वाट लावली
मंदीतही उधारीच चालली
कामांची तर वाट लावली
स्वप्नातही खुर्ची पाहणार्‍या
ह्या सत्तापिपासुला
कुणी मत देणार का मत ?
----------------------------------------
पुर्व प्रसिध्दी मराठी संकेतस्थळ मिसळपाव.कॉम

Monday, December 22, 2008

(संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! )

चाल : रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
-----------------------------------------
रात्रीत गेम झाला, वस्तीतल्या गुंडाचा!
संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!!

हा गुंड ना स्वयंभू, जामिन राहतो हा
दंग्यात माणसांच्या, जाळपोळ करतो हा
पोलीस होई साथी, हा दूत शासनाचा
संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!!

खंडणी मागती हा, बॉलीवुडला शाप
जे 'भाई' सांगती ते करती आपोआप
हसतात नशिबाला हा दोष जाणीवांचा!
संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा

या लाजिर्‍या जिवाला, का खोकी दिलीत ?
असतील सर्व नोटा , चुपचाप या पेटीत
हरवेल नुर अपुल्या या धुंद जीवनाचा
संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा !!

-----------------------------------------------------
मुळ गाणे -

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा

आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा

या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा

गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - महेंद्र कपूर
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)

Tuesday, December 2, 2008

( जो नावडतो सर्वांना तोचि आवडे श्रेष्ठीला )

जो नावडतो सर्वांना तोचि आवडे श्रेष्ठीला

साद घालता दिसता कोणी, हात पक्षाचा जाई पळुनी
दु:ख राणेंचे पाही दुरुनी, होई आनंद विलासाला

घेउनि रामु अपुल्या साथी, रितेशही येता पाठी
सत्तेसाठी राष्ट्रवादी, आबा मुकती गृह खात्याला

अतिरेक्यांचे टळता संकट, देशमुख येई आता निघुन
जपुन आपुले राज्यशासन, नित भजतो सोनियाला

-------------------------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -
जो आवडतो सर्वांला तोचि आवडे देवाला


कोणी, घास मुखीचा मुखी घालुनी
दुःख नेत्रीचे घेता पिउनी, फोडि पाझर पाषाणाला

घेउनि पंगु अपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी
पायाखाली त्याच्यासाठी, देव अंथरी निज हृदयाला

जनसेवेचे बांधुन कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन आपुले हृदसिंहासन, नित भजतो मानवतेला